शिरूर हवेली मध्ये दुरंगी लढतीचा फायदा कोणाला?
कार्यकारी संपादक:- सुदर्शन दरेकर
शिरूर : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अशोक पवार 2009 पासून विधानसभेच्या रणांगणातून असून 2014 चा अपवाद वगळता दहा वर्षे आमदार असल्याने शिरूर हवेली मतदारसंघातील मतदार प्रत्येक पाच वर्षात नवीन नेतृत्वाला संधी देत असते त्यामुळे यावेळी शिरूर चे मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांना मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात असून, हवेली तालुक्यातील मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो यावर बरीचशी गणित अवलंबून आहेत. शिरूर हवेली मतदारसंघात आजपर्यंतच्या लढती शिरूर तालुक्यातील उमेदवार एकमेकांसमोर असल्याने हवेली तालुक्यातील मतदार महत्त्वाचा घटक मानला जात होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रिंगणात असून, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद त्यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन महायुतीच्या मागे भक्कम ताकद उभी करणार असल्याचे सांगितले आहे. भाजपा उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनीही महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले आहे. अशोक पवार यांनी 2009 मध्ये सत्तेत आल्यानंतर यशवंत कारखाना चालू करतो म्हणून दिलेल आश्वासन हवेतच विरले असून, स्वतःचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला असल्याने त्यांची भिस्त शरद पवार यांच्यावर अवलंबून आहे. नुकतेच शरद पवार यांनी शिरूर हवेलीतून गेलेल्या शिष्टमंडळाला घोडगंगा कोणत्याही परिस्थितीत चालू करणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अजित पवार यांनी अशोक पवार हे आपल्याबरोबर न आल्याने कारखाना जाणीवपूर्वक अडचणीत आणला की घोडगंगा सहकारी साखर कारखान्यास सरकारने निधी देण्यास असमर्थता दर्शवली हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांना शिरूर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यास अशोक पवार आघाडीवर होते. त्याचा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगळी असतात हे मतदार ओळखून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी लोकसभेप्रमाणे पुन्हा आयात उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते कशा पद्धतीने प्रचार करतात यावर कटके यांच्या विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत.
शिरूर तालुक्यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून स्थानिकांना रोजगारात डावले जात असल्याचे वारंवार दिसत असून, औद्योगिक वसाहत आंबेगाव विधानसभेला जोडली गेली असल्याने शिरूर हवेलीचे लोकप्रतिनिधी जास्त ढवळाढवळ करत नसल्याचे दिसत आहे.
पुणे ते शिरूर या महामार्गची होणारी वाहतूक कोंडी तालुक्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून गेली 15 ते 20 वर्ष नगर रोडची वाहतूक कोंडी सोडवण्यात कोणत्याही पक्षाला यश आलेले नाही. 2019 मध्ये महायुतीच्या बाजूने शिरूर हवेली येथील बहुसंख्य नेते गेलेले असताना अशोक पवार यांनी 42 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवत स्वर्गीय बाबूराव पाचरणे यांना पराभूत केलेले होते. शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात असून अशोक पवार यांच्या कार्यकाळात उभी राहिलेली पायाभूत कामे त्यांना विजयापर्यंत नेण्यास मदत करतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे माऊली कटके यांची धार्मिक यात्रा विधानसभेत चांगली चर्चेत आलेली असताना नवीन चेहऱ्याला संधी देण्याची मानसिकता तरुणाई समोर असल्याने हवेली तालुक्याला नेतृत्व करण्याची संधी कटके यांच्या रूपाने मिळत असल्याने हवेलीकर कोणत्या उमेदवाराला झुकते माप देणार हे निकालानंतरच ठरेल ही विधानसभा निवडणूक चुरशीची अटीतटीची व रंगतदार होणार यात शंकाच नाही निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
